“…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो”-मनोज जरांगे पाटील
कोणत्या मागण्या सरकारकडून मान्य?
मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. अखेर त्यांचे उपोषण यशस्वी झाले असून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता आपण पाहूया की, सरकारने त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत.
1. हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार, याचं सर्व श्रेय फडणवीसांना जाणार
2. हैदराबाद गॅझेटबद्दल सरकार लगेच जीआर काढणार
3. 1 महिन्यात सातारा गॅझेटियरबाबत अंमलबजावणी केली जाणार
4. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार
5. 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार
6. बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत दिली जाणार
7. राज्यपालांच्या सहीनं तातडीनं GR काढण्याचं आश्वासन
8. शासन मराठा आंदोलकांवरील दंड मागे घेणार
9. हैदराबाद गॅझेटचा जीआर अर्ध्या तासात जरांगेंकडे सोपवला जाणार
मनोज जरांगे काय म्हणाले?
“आपलं म्हणणं जे होतं ते आपण लेखी स्वरुपात सरकारसमोर मांडलेलं होतं. पहिला विषय म्हणजे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती. यावर सरकारने निर्णय केला आहे. हा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्याचा जीआर काढतो असं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं आहे. उपसमितीने असा निर्णय केला आहे की हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या प्रस्तावित मागणीसाठी शासन निर्णयाला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार गावातील मराठा जातीच्या व्यक्तींना, गावातील, कुळातील, नातेवाईकांना कुणबी जातीचे प्रमाण पत्र मिळाले असल्यास त्याबाबत चौकशी करून प्रमाण पत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावीत आहे, म्हणजे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्याला मान्यता देण्यात आली आहे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Shabdraj www.shabdraj.com