17/07/26
Breaking News

एसटीच्या तिकीट दरांत भरमसाठ वाढ,सफाई खर्चाचा बोजा प्रवाशांवर

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी तिकीट दरात 10 टक्क्यांची हंगामी वाढ जाहीर केली असून, प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही लागू केला आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल-मे महिन्यात शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्या सुरू होताच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर या प्रमुख बसस्थानकांमधून राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः 25 एप्रिलनंतर सुट्ट्यांची सुरुवात होत असल्याने येत्या काळात प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या बसचं तिकीट महागलं?

एसटी महामंडळाने लागू केलेली ही दरवाढ मुख्यतः साध्या (लाल परी) आणि निमआराम गाड्यांसाठी आहे. मात्र, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, जनशिवनेरी, शयनयान आणि ई-बस (शिवाई) या सेवांना या वाढीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
‘त्या’ प्रवाशांनाही मोजावे लागणार जादा पैसे

दरम्यान, ज्यांनी आधीच आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांनाही ही वाढ लागू होणार असून, त्यांना प्रवासादरम्यान भाड्यातील फरकाची रक्कम कंडक्टरकडे भरावी लागणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवाढीचा मोठा फटका

महागाई, वाढते इंधन दर आणि रोजच्या खर्चात होणारी वाढ यामुळे सामान्य नागरिक आधीच आर्थिक तणावाखाली आहेत. अशातच एसटीच्या भाडेवाढीचा निर्णय त्यांच्या अडचणी आणखी वाढवणारा ठरत आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाढीचा मोठा फटका बसणार आहे.

एसटी महामंडळाच्या मते, वाढती खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ही हंगामी दरवाढ आवश्यक आहे. मात्र, प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय उन्हाळ्याच्या काळात उन्हाचा चटका आणि खिशाला फटका देणारा ठरत आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …