27/04/26
Breaking News

संकल्प मानव विकास संस्थेची शासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

रमेश बिजुले
पाथरी,दि 21 
येथील हॉटेल प्रियल येथे आज दिनांक २१ एप्रिल रोजी संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न झाली. संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक  सुधाकरराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न, महिला-बाल आरोग्य आणि कामगारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देणारी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’ (PPT) दाखवण्यात आली. यामध्ये संस्थेने आतापर्यंत केलेले कार्य आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
या प्रमुख विषयांवर झाले मंथन:
तालुका स्तरीय BCPC बैठकीची गरज: बैठकीत प्रामुख्याने तालुका स्तरावरील बाल संरक्षण समिती (BCPC) च्या बैठका नियमितपणे होणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. बाल हक्कांचे संरक्षण आणि विविध विभागांमधील समन्वयासाठी ही समिती सक्रिय होणे काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बालकल्याण आणि सुरक्षा: समाजात आजही छुप्या मार्गाने होणारे बालविवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
आरोग्य मोहीम: किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरण आणि शाळा-अंगणवाड्यांमधील मुलांसाठी जंतनाशक गोळ्यांची उपलब्धता वेळेवर व्हावी, यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
कामगारांचे प्रश्न: ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना त्वरित ओळखपत्र वाटप करणे आणि कामगारांच्या ‘लेबर कार्ड’चे नूतनीकरण  जलद गतीने करण्याबाबत संबंधित विभागाला विनंती करण्यात आली.
शिक्षण आणि वसतिगृह: अंगणवाडी आणि शाळांमध्ये योग्य समन्वय असावा, तसेच पाथरी येथे संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह तातडीने कार्यान्वित व्हावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होईल, या मुद्द्यावर विशेष जोर देण्यात आला.

या बैठकीला नायब तहसीलदार आर. बी. धोपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. एस. पुजारी,गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मंगलताई गायकवाड, विस्तार अधिकारी एस. बी. घुमरे,एन. जी. शितळे ,एपी हत्तीआंबेरे, गुजवटीकर, आर. एन. गिराम,. एच. जी. माने, रणदिवे  उपस्थित होते.

Check Also

“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा

सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 …