17/07/26
Breaking News

भारतीय संविधान समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – उत्तम कांबळे

सेलू ( प्रतिनिधी )
संविधान संघर्षाचा विषय आहे. संघर्षातून नवीन जग निर्माण होते. संविधानाने पराभूत माणसांचा इतिहास बदलून विजेत्या माणसांचा इतिहास रचला. भारतीय संविधाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. भारतीय संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे ( नाशिक ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार ( दि.२० ) रोजी साई नाट्यगृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे होते. तर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून झाले. विचारमंचवर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे, तहसीलदार डॉ. शिवाजीराव मगर, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, गणेश काटकर, दत्ता तांबे, अशोक कासार, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, ” लोकशाहीचा कणा लोक असतात. लोकशाहीच्या भवितव्यासाठी लोकांत गुणवत्ता असावी.भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा आपला आत्मा आहे. मत विकून आपण आपला आत्मसन्मान विकू नये. संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान आहे.” असेही ते म्हणाले. स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी करून दिला. सुत्रसंचलन डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माधव गव्हाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध काकडे, रामराव बोबडे, आबासाहेब लोंढे, संतोष ताल्डे, पांडुरंग पाटणकर, गजानन साळवे, गंगाधर अवचार, सुमेध आवटे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

सामान्यज्ञान स्पर्धेत आराध्या,सृष्टी, प्रियंका प्रथम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत पाचवी ते सातवी गटात आराध्या सावंत, सांची भालेराव, रायबा भोसले, आठवी ते दहावी गटात सृष्टी कदम,समृद्धी बुरेवार, प्रतिक्षा चिंचोलीकर, आकांक्षा भालेराव, तर अकरावी ते पदव्युत्तर गटात प्रियंका डंबाळे, श्याम बोरकर,गायत्री पवार, प्रणव जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह, संविधानाची प्रत देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …