17/07/26
Breaking News

उष्णतेचा पारा प्रचंड वाढला,अकोल्यात कहर,परभणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज  व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गत काही दिवसांपासून राज्यातील शहरांच्या तापमानात भयंकर वाढ होताना दिसून येत आहे. विशेषतः अकोल्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांपैकी एक ठरत आहे. गत 21 एप्रिल रोजी अकोल्यात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यानंतर 22 एप्रिल रोजी 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर 23 एप्रिल, 24 एप्रिल व 25 एप्रिल रोजी अनुक्रमे 44.3, 45 व 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दिवसागणिक वाढणाऱ्या या तापमानामुळे नागरीक पुरते हैरान झालेत.

परभणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

परभणीत उष्माघातामुळे शिवाजी बबन कांबळे नामक 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कांबळे हे नाशिकहून परभणीला आपल्या भावाकडे आले होते. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या भावाच्या फिर्यादीनुसार, शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेवर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …