23/06/26
Breaking News

रामवाडी फीडरवरील रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कळमनुरी,दि 23 (प्रतिनिधी)ः
कळमनुरी तालुक्यातील मसोड उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या रामवाडी फीडरवरील सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी मसोड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.
हे निवेदन कळमनुरी महावितरणचे अभियंता श्री. जयस्वाल यांच्यामार्फत सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मसोड उपकेंद्रांतर्गत रामवाडी फीडरवर एकूण आठ डी.पी. (रोहित्रे) असून या फीडरवर मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर शेती व्यवसायासाठी अवलंबून आहेत.
या फीडरवरील डी.पी.वर अवलंबून असलेल्या सुमारे ५० टक्के शेतकरी व शेतमजूर आपल्या कुटुंबासह, लहान मुलाबाळांसह शेतातच वास्तव्यास आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शेत परिसरात साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारमय होतो. त्यामुळे शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
नुकतीच या परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोलर पॅनेलची सुमारे ५० हजार रुपये किमतीची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. वीजपुरवठा नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षाविषयक दिवे यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे वापरता येत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वी या भागात रात्री सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध होता; मात्र सध्या तो बंद करण्यात आल्याने शेतात राहणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे मसोड उपकेंद्रांतर्गत रामवाडी फीडरवरील सर्व आठ डी.पी.वर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा तातडीने व नियमितपणे सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भविष्यात अंधारामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठी चोरी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन अभियंता श्री. जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …