02/08/26
Breaking News
Oplus_16908288

बहुमताच्या राजकारणात गंगाखेडचा विकास बळी!

१५५ विकासकामांना सभागृहातच ‘ब्रेक’; सर्व २४ ठराव फेटाळले

भुयारी गटार, पाणीपुरवठा, गोदावरी स्वच्छता, रस्ते, दलित वस्ती विकास, नगरोत्थानसह कोट्यवधींच्या योजनांवर पाणी; अवघ्या काही मिनिटांत सभा संपुष्टात
रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी –
गंगाखेड नगर परिषद कार्यालयातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, विकासकामांवर सविस्तर चर्चा होण्याऐवजी बहुमताच्या राजकारणामुळे संपूर्ण सभेचेच गणित बिघडले आणि सभेपुढे ठेवण्यात आलेले २४ पैकी सर्वच ठराव ११ विरुद्ध १४ मतांनी नामंजूर करण्यात आले. एक सदस्य तटस्थ राहिला.

 

सभेत महाराष्ट्र शासनाच्या जागतिक बँक साहाय्यित महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल, नमामी गंगा अभियानांतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, शहरातील नाल्यांची सफाई, स्वच्छ भारत अभियान २.०, घनकचरा व्यवस्थापन, ‘आपला दवाखाना’ योजना, हायमास्ट व सोलर पथदिवे, स्मशानभूमी सुशोभीकरण, पाण्याच्या टाक्या, नाली-गटारे, रस्ते, दलित वस्ती विकास, अल्पसंख्याक विकास, जिल्हा वार्षिक योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान, नगर विकास योजना, नगर परिषद निधीतील विकासकामे, अंगणवाडी प्रस्ताव तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार करावयाच्या कामांसह एकूण १५५ विकासकामांवर निर्णय अपेक्षित होता.

 

मात्र, कोणत्याही विषयावर सखोल चर्चा न होता काही मिनिटांतच मतदान घेण्यात आले आणि बहुमताअभावी सर्व ठराव फेटाळण्यात आले. परिणामी शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या योजना पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर परिषदेत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल साळवे, नगर अभियंता अमोल तांदळे व श्रीनाथ गित्ते, नगररचनाकार शोएब खान व प्रतीक लवांदे, लेखापाल अशोक फडतरे, सभा विभाग प्रमुख गणेश सुरवसे, कार्यालयीन अधीक्षक नागनाथ साळवे, वसुली विभाग प्रमुख सुरेश मणियार तसेच एसआय सुहास आगलावे आदींची उपस्थिती होती.

 

 

“सभागृहात राजकारण जिंकले… शहर हरले!”
गंगाखेडच्या नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारे आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत; पण सभागृहात विकासापेक्षा राजकीय आकडेमोड महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले. १५५ विकासकामांचे भवितव्य काही मिनिटांत ठरले; मात्र त्याची किंमत आता गंगाखेडकरांना विकास रखडून मोजावी लागणार का?

Check Also

परभणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती…

परभणी / प्रतिनिधी – परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर …