गंगाखेड,दि 06 ः
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया, गंगाखेड शाखेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या प्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे म्हणाले, “आम्ही डॉक्टर नागरिकांच्या बिघडलेल्या आरोग्याची काळजी घेतो, मात्र संपूर्ण समाजव्यवस्थेचं बिघडलेलं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. समाजातील सकारात्मक व नकारात्मक वास्तव व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करत आहेत, ही आशादायी बाब आहे.”
पत्रकार समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. सध्याच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या पत्रकारांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. अशा वेळी समाजाचे स्वास्थ्य जपणाऱ्या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य निरोगी राहावे, याच भावनेतून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले, असे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे, बालरोगतज्ज्ञ डॉ. केशव मुंडे, डॉ. चट्टे, डॉ. कालिदास निरस (आर.एम.ओ., जिल्हा सामान्य रुग्णालय), डॉ. कदम, डॉ. जाधव, डॉ. प्रतीक्षा बडे, महसूल सहाय्यक सुनील चापळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष अनवर लिंबेकर, रामप्रसाद ओझा, अंकुश कांबळे, भागवत जलाले, अली चाऊस, शिवाजी कांबळे, राजेश वटमवार, गंगाधर कांबळे, उत्तम दसवंते, मोहसीन खान, ज्ञानोबा कदम, राम पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : पवित्र सेवेतही आर्थिक वेदना
आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान चर्चेतून एक गंभीर बाब समोर आली.
उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत नर्स, सिस्टर व ब्रदर्स यांना तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तसेच कोणतेही भत्ते मिळत नसल्याने हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून आले.
रुग्णसेवेसारख्या पवित्र कार्यात झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी अपेक्षा उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली .
Shabdraj www.shabdraj.com