04/02/26
Breaking News

मराठा आरक्षण आंदोलनात खासदार,आमदारांचा सहभाग,सरकारवर दबाव वाढला..

मुंबई,दि 29 ः
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या  मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार यांनी पाठिंबा दिला आहे.या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे.उद्या शनिवारी काही आमदार खासदार सहभागी होणार असल्याची माहीती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे हे आझाद मैदानावर आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बिडचे खासदार बजरंग सोनवणे,शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर,धाराशिवचे आमदार कैलास पाटील,आमदार अभिजीत पाटील,गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित या नेत्यांनी व्यासपीठावर येऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.या नेत्यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ पाठिंबा देऊन माघारी न जाता, जरांगे पाटलांसोबत उपोषणस्थळी काही काळ बसले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता आझाद मैदानाकडे वेधले आहे.

त्यासोबतच त्यांच्या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आंदोलन करीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हिंगोलीतील खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, या आमदार, खासदारांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. यामुळे या आंदोलनात अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्य सरकारसमोरची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. या सर्व घडामोडींमुळे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करणे भाग पडणार आहे, असे दिसून येते.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील चार खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …