सोनपेठ (प्रतिनिधी)
सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात दि. ८ एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकचा अपघात झाला. या अपघातात न.प.स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे.
सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५ वर्ष)यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सहकारी धृपताबाई सुर्यभान वाघमारे (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिला कर्मचारी सकाळी सोनखेड परिसरात स्वच्छतेचे काम करत असताना एम एच १२ एफसी ७४५९ क्रांमाकाचा हायवा चालक आपले वाहन वळवताना थेट काम करत असलेल्या महिलांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुळसाबाई पाडुळे व धृपताबाई वाघमारे या गंभीर जखमी होऊन अस्वस्थ झाल्या. यावेळी नागरिकांनी त्यांना सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तुळसाबाई पाडुळे यांना डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले तर जखमी धृपताबाई वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हायवा चालक विठ्ठल अंगद मुंढे (वय २४ वर्ष ) रा. रेवली ता. परळी या चालकास ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अपघातप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हायवा चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा सोनपेठ पोलीस तपास करत आहेत..
Shabdraj www.shabdraj.com