सेलू ( प्रतिनिधी )
दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय योगदान होते. त्यांची संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मुल्यांवर निष्ठा होती. ते विचारापेक्षा कृतीवर भर देत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते ‘ श्रीरामजी भांगडिया यांचे जीवन – कार्य’ या विषयावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने दलितमित्र श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती व संविधान दिनानिमित्त नूतन विद्यालयाच्या रा.ब. गिल्डा सभागृहात बुधवार ( दि. २६ ) रोजी आयोजित व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील यांची उपस्थिती होती. श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती समितीचे संयोजक तथा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, ” श्रीरामजी भांगडिया यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष असताना पक्के सिमेंट रस्ते केले. त्याकाळात स्वच्छ शहर सुंदर शहर, स्वच्छता अभियान राबविले. घरकुल योजनेतून सर्वोदय नगर उभारले. जवळपास ९५ सर्वसामान्य नागरिकांना मोफत घर दिले. शिशू विहार, चार बालवाडी, महिलांसाठी ग्रंथालय स्थापन केले. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केली. मुलींच्या शिक्षणासाठी कन्या प्रशाला तर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केले. श्रीरामजी भांगडिया यांनी लोकशिक्षणाचे काम शेतीच्या माध्यमातून केले.” असेही ते म्हणाले. संविधान दिनानिमित्त डॉ. सुरेश हिवाळे यांनी संविधानाचे महत्व सांगून संविधान उद्देशिकेचे वाचन केले. सच्चिदानंद डाखोरे आणि गीत मंचच्या विद्यार्थ्यांनी ‘ खरा तो एकची धर्म ‘ हे गीत सादर केले. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन शिल्पा बरडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुभाष बिराजदार यांनी केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, उद्योजक महेशराव खारकर, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, निशा पाटील, उल्हास पांडे, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, परसराम कपाटे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर, ललिता गिल्डा, प्राध्यापक , शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com