16/10/26
Breaking News

निवडणुकीत ‘AI’चा धोका,आम्ही कोणासोबत जाणार नाही.-शरद पवार

‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्या या,’ असा खणखणीत संदेश देत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. तसेच आपली वाटचाल पुन्हा तेवढ्याच तडफेने सुरू राहील, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण धोरणातील त्रुटींवर सडकून टीका केली.

विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

आपल्या भाषणात शरद पवारांनी पक्षात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर स्पष्ट शब्दांत पडदा टाकला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे. आम्ही कुणाच्याही जवळ जाणार नाही किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही. हा निर्णय पक्का असून, आपल्याला आता थेट लढाई द्यायची आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

निवडणुकीत ‘AI’चा धोका

बैठकीत शरद पवारांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. बारामतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संस्थेतील एक किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी तिथे गेलो तेव्हा दोन रोबोट उभे होते. एकाने मला खडाक करून सॅल्यूट मारला आणि मी परत फिरल्यावर तो माझ्या मागे चालत आला. रोबोटचा उपयोग अनेक प्रश्न सोडवण्यासाठी होत आहे, पण त्याचे धोकेही मोठे आहेत. मला काळजी ही आहे की, ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने तुमच्या निवडणुकीचे निकाल कसे फिरवायचे, यासाठीही वापरली जातील. अमेरिका, युरोपमध्ये याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या तंत्रज्ञानाविषयीचे लेख वाचून स्वतःची मानसिकता तयार करावी, अन्यथा संघटनेला मोठी किंमत मोजावी लागेल.”

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …