गंगाखेड (प्रतिनिधी) – शहरातील राजेंद्रपेठ गल्लीचा राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा-पोह्यांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या या सेवाभावी उपक्रमाचे यंदाचे १४ वे वर्ष असून दि. २५ सप्टेंबर रोजी तब्बल ५ क्विंटल कांदा-पोह्यांचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला.
राजेंद्रपेठ गल्ली येथील श्री गणपती मंदिरात मंडळाच्या वतीने दरवर्षी श्री गणेशमूर्तीची भक्तिभावाने स्थापना केली जाते. गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांना कांदा-पोह्यांचा महाप्रसाद देण्याची परंपरा मंडळाने गेल्या चौदा वर्षांपासून अखंडपणे जपली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य महाप्रसादाच्या तयारीसाठी मोठ्या उत्साहाने कार्यरत होते. कांदा-पोहे तयार करण्यापासून ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यापर्यंत प्रत्येक कामात सेवाभाव दिसून येत होता.
गंगाखेड शहरातील भगवती चौक व राजेंद्रपेठ गल्ली हा मुख्य गणेश विसर्जन मार्ग असल्याने दिवसभर या परिसरात गणेश भक्तांची मोठी वर्दळ होती. सर्वच गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या मार्गाने जात असताना भाविकांनी राजेंद्रपेठ गल्लीतील गणपती मंदिराजवळ थांबून गरमागरम कांदा-पोह्यांचा आस्वाद घेतला.
सकाळपासून सुरू झालेला हा महाप्रसाद रात्री सुमारे ११ वाजेपर्यंत म्हणजेच मिरवणुकीची सांगता होईपर्यंत सुरू होता. दिवसभर हजारो भाविकांनी लाभ घेतला.
भक्तांची भूक भागवणारा प्रसाद –
गावठाण भागातून व नवीन शहरातून सर्व गणेश मंडळे ही शिवाजी चौक, राजेंद्रपेठ गल्ली मार्गे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. राजेंद्रपेठ गल्लीत येईपर्यंत भुकेची वेळ झालेली असते, ती भूक या पोह्याच्या प्रसादाने भागवली जाते. आधी राजस्थानी समाज मंडळी मसाला चणे, मटकी उसळचा प्रसाद वाटप करत होते, तीच सेवा आता पेठगल्लीच्या गणेश मंडळाने पुढे चालू ठेवली आहे. या उपक्रमातून भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडतो आहे.
Shabdraj www.shabdraj.com