परभणी | प्रतिनिधी – मतदार यादीत कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (बीएलओ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी परभणी शहरातील बालाजी भोजनालय, स्टेशन रोड परिसरात करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेस नोटनुसार, रामेश्वर विलास काळे (वय ३७) हे सहायक शिक्षक असून प्रेरणा विद्यानिकेतन, वैभव नगर, जिंतूर रोड, परभणी येथे कार्यरत आहेत. तसेच ते परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम पाहत आहेत. ते चिंचोली काळे, ता. जिंतूर, जि. परभणी येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराने १८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी S.I.R. फॉर्मअंतर्गत अर्ज करण्यात आला होता. मात्र, संबंधित बीएलओने कुटुंबातील दोन सदस्यांची नावे २००२ च्या मतदार यादीत नसल्याचे सांगून ती नावे समाविष्ट करण्यासाठी सुरुवातीला २,५०० रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणतीही शासकीय फी लागत नसतानाही लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
तक्रारीची पंचांसमक्ष १९ ऑगस्ट रोजी परभणीतील बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान बीएलओ रामेश्वर काळे यांनी तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्यांची नावे S.I.R. मध्ये समाविष्ट करण्याचे काम केल्याचे सांगत तडजोडीनंतर २,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने परभणी शहरातील बालाजी भोजनालय, स्टेशन रोड येथे सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी बीएलओ रामेश्वर काळे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष २,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची प्रक्रिया केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी आणि एसीबीच्या पथकाने केली. या कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास विभागाशी संपर्क साधावा.
Shabdraj www.shabdraj.com