30/10/26
Breaking News

औंढ्यात ६ दुकाने आगीत जळून खाक;२ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

विलास काचगुंडे
औंढा नागनाथ,दि 30
औंढा नागनाथ शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या दुकानांना आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. ३० ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. औंढा नागनाथ व हिंगोलीच्या अग्नीशमनदलाने दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ शहरातील जुन्या बसस्थानकाच्या परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्ती, बॅटरी दुरुस्ती, इलेक्ट्रीकल्स साहित्य विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून अचानक धुर निघू लागला होता. या परिसरात असलेल्या हॉटेल चालकांनी दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी आरडा ओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरीक मदतीसाठी धावले. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब शेख, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण, अनिल नागुलवार, दिनकरपोले, वसंत चव्हाण, रवीकांत हरकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक काही काळ थांबवून तातडीने हिंगोली व औंढा नागनाथ येथील अग्नीशमनदलास पाचारण केले. दरम्यान, दोन तासानंतर म्हणजेच सुमारे ९ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, तो पर्यंत सहा दुकाने जळून खाक झाली होती. या आगीमध्ये सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीष बेद्रे, अब्दुल कदिर, रामभाऊ साळुंके यांच्या दुकानांचे नुकसान झाले असून हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
पोलिस व नागरीकांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव केल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.महसूल विभागाच्या पथकाने पंचनाम्याची तयारी चालविल्याचे सुत्रांनी सांगितले.

Check Also

केशव वाघमारे महाराष्ट्र एक्स लाइन्स पुरस्काराने सन्मानित

औंढा नागनाथ प्रतिनिधी तालुक्यातील येथील सिद्धनाथ नागनाथ अग्रवेट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर केशव वाघमारे …