राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज, मंगळवार (२८ ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त ११ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, ही रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचली असून, आता पुढील टप्प्यातील निधी वाटप सुरू होणार आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि हंगामी तयारीसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पूरग्रस्तांसाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच ३१ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजचा एक भाग म्हणून सध्याची ११ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात आहे. फडणवीस म्हणाले की, “आम्ही ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या देखील लवकर सोडवण्यात येतील.
”Agristack नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Agristack पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. सरकारकडे त्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्याने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. ही व्यवस्था प्रक्रियेला गती देणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा सरकारी कार्यालयांची धावपळ करावी लागणार नाही.
Shabdraj www.shabdraj.com