मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द होणार असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी या व्यवहाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ती समिती संपूर्ण प्रकरणाची तपासणी करणार आहे. चौकशीत सर्व घटनाक्रम समोर येतील — कोणी मदत केली, कुणाचे फोन गेले, हे सगळं स्पष्ट होईल.”
ते पुढे म्हणाले, “मी नेहमीच माझ्या स्वकीयांना आणि नातेवाईकांना सांगतो — नियमाच्या बाहेर जाऊन काहीही केलं तर ते मला मान्य नाही.”
अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, “या व्यवहाराची मला अजिबात माहिती नाही. माहिती असते तर मला विचारून व्यवहार झाला आहे, असे बोललो असतो. माझ्या नातेवाईकांनी किंवा जवळच्या व्यक्तीने व्यवहार केला तर मी त्यांना नियमाला धरून व्यवहार करा, असे सांगत असतो. सदर प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला असताना भाष्य केले होते. त्यांच्याशी फोनवर बोलताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितलो होते की, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. कारण आरोप करणे सोपे असते पण वस्तुस्थिती समोर येणेही आवश्यक असते.”
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात होत आहे, तसेच नियमानुसा मुद्रांक शुल्क 6 कोटी रुपये होत असताना केवळ 500 रुपये इतकेच भरले गेल्याचा आरोप देखील होत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे.
कायद्यानुसार महार वतनाची जागा सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. तसेच, ती हस्तांतरित किंवा गहाणही ठेवता येत नाही. मात्र, ४० एकरांचा हा भूखंड पार्थ यांच्या कंपनीने घेतला असून, जमीन व्यवहाराची किंमत कमी दाखवून मुद्रांक शुल्कही बुडविण्यात आला आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून त्याची तातडीने दखल घेण्यात आली.
Shabdraj www.shabdraj.com