दै. शब्दराज / गंगाखेड
गंगाखेड शहरातील नागरिक आधीच धुळीच्या प्रचंड समस्येमुळे त्रस्त असताना आता वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे अक्षरशः मुश्किल झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत धुळीचा मुद्दा चांगलाच गाजला, मात्र निवडणूक संपताच तोच प्रश्न पुन्हा जैसे थे असून, त्यातच आता वाहतूक कोंडीची भर पडली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडे, ऑटो रिक्षा, दुचाकी व चारचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे पन्नास फुटांचे रस्ते आज अवघ्या दहा फुटांवर आले आहेत. अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे की, वाहतुकीसाठी मोकळी जागाच उरलेली नाही. अतिक्रमण हटविल्याशिवाय वाहतूक कोंडी सुटणार नाही, असे स्पष्ट मत संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेषतः परभणी–परळी राज्य महामार्गावरून शहरात प्रवेश करताच महाराणा प्रताप चौकात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या चौकात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाही, एकाही हॉटेलधारकाने वाहन पार्किंगची ठोस व्यवस्था केलेली नाही. परिणामी गोविंदराज हॉटेलसमोर व वळण रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे वाहनचालक, रुग्णवाहिका, शालेय वाहने व पादचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी दिनांक २९ डिसेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. मात्र तक्रार देऊन तब्बल आठ दिवस उलटले तरी ना बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई, ना हॉटेल मालकांवर कोणतीही दखल, असा आरोप होत आहे. यामुळे “पोलीस प्रशासन झोपेत आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महाराणा प्रताप चौकातील सर्व हॉटेलधारकांना पार्किंगची सक्ती करावी तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जावेद खान यांच्यासह शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. तात्काळ वाहतूक कोंडी सुरळीत न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी दिला आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्षांसमोर शहरातील वाहतूक व अतिक्रमणाचा प्रश्न हे मोठे आव्हान ठरणार आहे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
Shabdraj www.shabdraj.com