राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.
मात्र ही केवळ दुर्घटना नसून यामागे घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित केले असून मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला. पायलटच्या मदतीनेच हा घातपात घडवण्यात आला असावा, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केल्यावर काही बाबी संशयास्पद वाटतात. एखादा चेंडू मऊ मातीत पडला तर कमी उसळी घेतो, पण कठीण रस्त्यावर पडला तर जास्त उड्या घेतो, असे उदाहरण देत त्यांनी सांगितले की विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळले. त्यामुळे त्याचा धक्का अधिक तीव्र झाला. स्फोटाचे मुख्य कारण विमानातील जादा इंधन असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मते, या विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या होत्या. सामान्यतः अशा विमानांमध्ये प्रसाधनगृहाजवळ इंधन टाक्या असतात आणि त्याच्या जवळच उड्डाण नोंद यंत्र असते, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधन पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर तेथेच पूर्ण इंधन भरण्याची गरज काय होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, जर महाराष्ट्रात इंधन स्वस्त आहे म्हणून ते भरले असेल, तर गुजरातमध्ये त्याहून स्वस्त इंधन उपलब्ध होते, असा युक्तिवादही त्यांनी मांडला. त्यामुळे एवढ्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी टाक्या पूर्ण भरण्याचा निर्णय का घेतला गेला, हे तपासले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. जादा इंधन असल्यास स्फोटाची तीव्रता वाढते, ही शंका आता खरी ठरत असल्याचे ते म्हणाले.
तपासातून काय निष्पन्न होते, याकडे राज्याचे लक्ष
या सर्व बाबींचा विचार करता हा अपघात नसून नियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम दावा रोहित पवार यांनी केला. पायलटची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या प्रकरणातील प्रत्येक तांत्रिक बाबीची तपासणी झाली पाहिजे, तसेच इंधन भरण्याच्या निर्णयामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आधीच राज्यात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता घातपाताच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
व्हीएसआर कंपनीकडून पुराव्यांशी छेडछाड, कागदपत्रांमध्ये फेरफारीचे प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप
यावेळी रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
Shabdraj www.shabdraj.com