07/05/26
Breaking News

बच्चु कडुंची घरवापसी… एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेतला धनुष्यबाण हाती

मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यानी आज एकनाथ  शिंदे यांच्या नेतृत्वात धनु्ष्य बाण हाती घेतला आहे.
विशेष म्हणजे बच्चू कडू हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी वेगळी वाट निवडत प्रहार सामाजिक संघटनेतून राजकीय-सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत बच्चू कडू यांची घरवापसी झाली असल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी म्हटले की, निव्वळ आमदारकीसाठी नव्हे तर मुद्याच्या लढाईसाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. ही लढाई पदासाठी नसून लोकांच्या मुद्यांची लढाई आहे. या राज्यात ठिकठिकाणी कामगार-शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभी करू असा निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. आमचा झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा कायम राहणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले.

बच्चू कडू आपला ‘प्रहार’ राजकीय पक्ष आता अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करणार आहेत. मात्र, त्यांची ‘प्रहार’ सामाजिक संघटना पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे कार्यरत राहील आणि जनहिताची कामे करत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना प्रहार या सामाजिक संघटनेचा राजकीय वाटचालीत फायदा झाला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. आता शिवसेना शिंदे गटात विलीन होत असताना दुसरीकडे प्रहार सामाजिक संघटनेचं अस्तित्व मात्र राहणार आहे.या मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विलीनीकरणाच्या अटी आणि भविष्यातील राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात परतत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा …