25/06/26
Breaking News

पूर्णेत पालिकेच्या जागेवर शाळेची‘घेराबंदी’, प्रशासनाचे मौन संशयाच्या भोवऱ्यात

पूर्णा प्रतिनिधी :
पूर्णा शहरातील सार्वजनिक मालमत्तेच्या कथित बळकावणीचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला असून, पालिकेच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. झाकीर हुसैन प्राथमिक उर्दू शाळेकडून कोंडवाडा आणि मुसाफिरखाना या सार्वजनिक जागांवर टप्प्याटप्प्याने कब्जा करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, “पालिका प्रशासन नेमके कुणाच्या दबावाखाली काम करत आहे?” असा संतप्त सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे.
जनावरांसाठी उभारण्यात आलेला कोंडवाडा आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेला मुसाफिरखाना हे दोन्ही भाग मागील अनेक वर्षांपासून पूर्णपणे बंदिस्त अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तात्पुरत्या वापराच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रकार आता कायमस्वरूपी ताब्यात बदलला आहे. शाळेनी मुसाफिर खानावर भिंत बांधून व कोंडवाडा पत्रे मारून बंदिस्त व्यवस्था उभारून सार्वजनिक जागेचा मुक्त वापरच संपवण्यात आला असून शाळेने पूर्णपणे घेराबंदी केली आहे

माहितीनुसार, संबंधित शाळा पालिकेच्या जागेवर करार तत्वावर सुरू आहे. मात्र, कराराच्या अटींच्या बाहेर जात शेजारील सार्वजनिक जागांवरही हळूहळू नियंत्रण मिळवण्यात आले. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कोंडवाडा आणि मुसाफिरखाना या दोन्ही ठिकाणांचा मूळ उद्देशच संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. या जागांचा वापर आता शाळेच्या अंतर्गत कामांसाठी होत असल्याची चर्चा नागरिकांतून उघडपणे सुरू आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत हातगाडी चालक, छोटे दुकानदार आणि रस्त्याकडील व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली होती. गरीब नागरिकांची दुकाने हटवण्यात आली, साहित्य जप्त करण्यात आले मात्र, पालिकेच्याच जागेवर सुरू असलेल्या या कथित बळकावणीवर प्रशासनाने घेतलेली भूमिका मात्र पूर्णपणे मवाळ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सामान्य माणसासाठी नियम वेगळे आणि प्रभावशालींसाठी वेगळे का?” असा संतप्त प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. उलट, विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद होत आहे.
दरम्यान, शाळेच्या रस्त्यालगतच्या जागेत झाडे लावून सीमारेषा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक जागेवर कब्जा मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली सुरू असून नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
या संदर्भात विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रारी देत कोंडवाडा व मुसाफिरखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने “या बळकावणीमागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे?” अशी जोरदार कुजबूज शहरात सुरू झाली आहे.
पूर्णा शहरात दिवसेंदिवस सार्वजनिक जागांवर होणारे कब्जे आणि त्यावर प्रशासनाचे संशयास्पद मौन यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी स्वतः हस्तक्षेप करून संबंधित जागांची पाहणी करावी, सार्वजनिक जागा तात्काळ मोकळी करून दोषींवर कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकातून पुढे येत आहे

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …