हिंगोली,दि 17 ः
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणायचीच, असा ठाम निर्धार आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला आहे. हिंगोली येथील हॉटेल शिवलीला पॅलेसच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रकाश थोरात, शेख निहायाल, कन्हैया बाहेती, संजय दराडे, शेख नांजिम, वसमतचे उपनगराध्यक्ष शेख इमरान, माजी नगराध्यक्ष राजू देशमुख, संचित गुंडेवार, रवींद्र गडदे, विकास शिंदे, सतीश टापरे, उत्तमराव पोले, हिंमत राठोड, वैशाली वाघ, विजय डोखळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजू नवघरे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. “विनाकारण मुंबईला निवेदने घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता गावपातळीवर पक्ष वाढवण्यासाठी ताकद पणाला लावावी,” असा सज्जड दम त्यांनी दिला. जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि बुथ पातळीवर व्यापक काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना लागेल ती सर्व मदत देण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदाच जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले असून, हीच ताकद कायम ठेवून राष्ट्रवादीला जिल्ह्यात ‘नंबर वन’ बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांनी स्पष्ट केले की, आगामी काळात प्रत्येकाच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल आणि पक्षशिस्त पाळणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या कामाचा पूर्ण आढावा घेऊनच तिकिटांचे वाटप केले जाईल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव
या मेळाव्याचे औचित्य साधून जिल्ह्यात नुकत्याच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीचे सूत्रसंचालन संजय दराडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रवींद्र गडदे यांनी मानले. या मेळाव्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.
Shabdraj www.shabdraj.com