हिंगोली,दि 23
शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या कार्यशैलीचे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जाहीर कार्यक्रमात भरभरून कौतुक केले. “सोशल मीडियाचा पक्षासाठी प्रभावी वापर कसा करायचा आणि पक्ष संघटना कशी मजबूत करायची, हे संतोष बांगर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “योगायोगाने आज संतोष बांगर स्टेजवर उपस्थित आहेत. मी फक्त साहेब आहेत म्हणून त्यांचे कौतुक करत नाही. आमच्या २८८ आमदारांमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आणि प्रभावी आमदार म्हणजे संतोष बांगर आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ते सातत्याने जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करत असतात.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “संतोष बांगर हे केवळ आमदार नाहीत तर ताकदीचे जिल्हाप्रमुख म्हणूनही काम करत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला असे जिल्हाप्रमुख मिळाले तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रभर फिरण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्याचे काम असे जिल्हाप्रमुख करू शकतात.”