गंगाखेड -प्रतिनिधी
अयोध्या धाम — पंढरीच्या वारकरी संप्रदायाची अखंड नामसाधना, भक्ती, वैराग्य आणि समतेचा संदेश घेऊन संत परंपरेच्या पवित्र पादुकांचे अयोध्या धाम येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. श्री ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर यांच्या नेतृत्वाखाली ह.भ.प. श्री संत मोतीराम महाराज, संत मारुती महाराज दस्तापूरकर तसेच ह.भ.प. श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या पादुकांचे श्री महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानाने आगमन होताच परिसर “रामकृष्ण हरि… विठ्ठल विठ्ठल” या गजराने दुमदुमून गेला.
वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक समतेचा, सदाचाराचा आणि नामस्मरणाचा मार्ग आहे. संतांच्या पादुकांचे दर्शन म्हणजे भक्तांसाठी साक्षात भगवंताच्या चरणी मस्तक टेकवण्याचा पावन क्षण मानला जातो. याच भावनेतून शेकडो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत हरिनामात तल्लीन होऊन आनंद व्यक्त केला.
या पावन प्रसंगाच्या निमित्ताने संत मोतीराम महाराज यांच्या परंपरेतील अखंड हरिनाम सप्ताह उद्यापासून अयोध्या धाम येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ होणार आहे. या सप्ताहात कीर्तन, भजन, हरिपाठ व नामस्मरणातून वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
या भक्तिमय स्वागत सोहळ्यास ॲड. व्यंकटराव तांदळे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा), बाळासाहेब निरस (माजी सभापती, गंगाखेड), सुरेश नाना नळदकर (सुप्रसिद्ध व्यापारी), नामदेवराव निरस (अडत व्यापारी), मनोहर महाराज केंद्रे, डॉ. परमेश्वर गुट्टे यांच्यासह अनेक वारकरी, भाविक आणि संतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि संतचरणी नतमस्तक होऊन अयोध्या धामात साक्षात पंढरी अवतरल्याचा अनुभव भाविकांनी घेतला.
Shabdraj www.shabdraj.com