12/06/26
Breaking News

आता गुटखा माफियांवर थेट मकोका,तुकाराम मुंडेचा धाडसी निर्णय

मुंबई: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
आतापर्यंत गुटख्याच्या कारवाईत केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेते अडकले जात होत तर मुख्य सूत्रधार पडद्यामागून सूत्रे हलवत असत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे चित्र बदलण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार हा आता संघटित गुन्हा मानला जाणार असल्याने या साखळीतील प्रत्येक घटकावर संक्रांत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पादक , मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, मोठे घाऊक विक्रेते गोदाम चालक संपूर्ण नेटवर्कच आता मुंढे यांच्या रडारवर आहे.

गुटखा किंवा प्रतिबंधित पानमसाल्याची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ लागल्यास गुन्हेगारांना कायदेशीर पळवाटा शोधणे कठीण होणार आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. जामीनासाठी अत्यंत कडक कायदेशीर अटींचा सामना करावा लागतो. बनावट कागदपत्रे तयार करणे, बेनामी व्यवहार करणे आणि शहराच्या सुरक्षित कोपऱ्यात गुप्त गोदामांच्या माध्यमातून काळाबाजार करणे यावर विशेष पथकांद्वारे पाळत ठेवली जाणार आहे.

10 वर्षात 703 जणांवर कारवाई
अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन, एफडीए आणि सरकारी अभियोक्ता यांच्यात थेट समन्वय असणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात मकोका प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचा फटका गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या माफियांना बसला आहे. गेल्या 10 वर्षांतील त्यांच्या कारवाईची आकडेवारी पाहिल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एकूण 703 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 260 उत्पादक, 248 पुरवठादार आणि 190 वाहतूकदार असे आहेत.

 

Check Also

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांना विविध उपक्रमाने अभिवादन

गंगाखेड प्रतिनिधी :- स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान …