17/10/26
Breaking News

ऑपरेशन टायगर संकटात:’शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही’, ओमराजेंच्या यू टर्नने, त्या पाच जणांची खासदारकी धोक्यात

‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि 5 जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे  मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,’ असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचे दिसते.

दुर्दैवी आणि धक्कादायक निकाल

तब्बल 20 वर्षांपू्र्वी झालेल्या पवनराजे हत्याकांड निर्णयाचा निकाल आज आला. या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘आज लागलेला निकाल दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. तिथेही निकाल नाही मिळाला, तर पुढे सर्वोच्च न्यायालयात जावू.’

लोकांशी चर्चा करून निर्णय

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली आहे. सहा खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर आहेत. आपल्या राजकीय भूमिकेवर ते म्हणाले की, ‘मी मतदार संघात जाईन. सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. या केसचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. गेली 20 वर्ष झाली. वडील, त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. त्यामुळे हा निकाल माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. आता मतदारसंघात जाईन. लोकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन.’

ओमराजे विधानाने 5 खासदारांची धाकधूक वाढली; ‘2/3’ चा कायदेशीर पेच?

शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका ताज्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अचानक खळबळ उडवून दिली आहे. ओमराजे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, “मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही,” असे सांगत त्यांनी सस्पेन्स वाढवला आहे. ओमराजेंच्या या भूमिकेमुळे केवळ त्यांच्याच नाही, तर त्यांच्यासोबत जाऊ इच्छिणाऱ्या इतर 5 खासदारांच्या भवितव्यावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. जर ओमराजे ठाकरे गटातच कायम राहिले, तर इतर पाच जणांची खासदारकी रद्द होऊ शकते, असे कायदेशीर सूत्रांचे म्हणणे आहे.

खासदारकी धोक्यात येण्यामागचे गणित काय?

संसदेतील पक्षांतरबंदी कायद्यानुसार (Anti-Defection Law) मूळ पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी एकूण लोकप्रतिनिधींपैकी किमान दोन-तृतियांश (2/3) सदस्यांचा पाठिंबा असणे अनिवार्य आहे.

ठाकरे गटाचे संख्याबळ: लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत.

  • कायदेशीर गरज: पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 9 पैकी किमान 6 खासदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
  • पेच कुठे अडकला?: सुरुवातीला 6 खासदार फुटणार अशी चर्चा होती. मात्र, आता ओमराजे निंबाळकर यांनी माघार घेतली किंवा ते ठाकरे गटासोबतच राहिले, तर बंडखोरांची संख्या केवळ 5 वर मर्यादित राहील. म्हणजेच आवश्यक असलेला दोन-तृतियांश आकडा गाठता येणार नाही.
  • ‘शरद यादव केस’चा बडगा आणि व्हीपचे हत्यार

    जर बंडखोर खासदारांची संख्या 5 वरच रेंगाळली, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बजावलेल्या ‘व्हीप’ (Whip/पक्षआदेश) नुसार, ठाकरे गटाकडून या पाचही खासदारांना अपात्र ठरवण्याची अधिकृत शिफारस लोकसभा अध्यक्षांकडे केली जाईल.

    या कायदेशीर लढाईत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयाच्या ‘शरद यादव विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्याचा दाखला देण्याची शक्यता आहे, ज्याअन्वये पक्षाच्या धोरणांविरुद्ध उघड भूमिका घेणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करता येऊ शकते. यामुळे या पाचही खासदारांना थेट घरी जावे लागू शकते.

    सर्व काही ओमराजेंच्या निर्णयावर प्रलंबित

    थोडक्यात सांगायचे तर, शिवसेनेच्या या अंतर्गत बंडखोरीची संपूर्ण सूत्रे आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आली आहेत. त्यांनी घेतलेला एक निर्णय या 5 बंडखोर खासदारांना कायदेशीर सुरक्षा देऊ शकतो किंवा त्यांचे संसद सदस्यत्व धोक्यात आणू शकतो. आता ओमराजे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    अचानक घेतला यू टर्न

    ‘भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे. समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही,’ अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे सुतोवाच दिलेल्या मुलाखतीकडे केले होते. मात्र, आता पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर त्यांनी ही भूमिका बदलल्याचे दिसते.

Check Also

अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन

Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी …