23/06/26
Breaking News

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे- मुकुंद आष्टीकर

सेलू ( प्रतिनिधी )
शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञाना लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे .असे प्रतिपादन महसूल विभागातील निवृत्त अधिकारी मुकुंद आष्टीकर यांनी जिजामाता बाल विद्यामंदिर मध्ये सत्कार सोहळा प्रसंगी केले .
राजश्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बाल विद्या मंदिर, सेलू या शाळेस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व शाळेच्या भौतिक सुविधांच्या उन्नतीसाठी मुकुंद आष्टीकर यांनी रु. ५०,००० (पन्नास हजार) रुपये देणगी प्रदान केली. या उदात्त सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव  डी. व्ही. मुळे हे होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती मुकुंद आष्टीकर, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी  बाबासाहेब चारठाणकर, मुख्याध्यापक रविंद्र पाठक तसेच श्रीनिवास आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक  रविंद्र पाठक यांनी प्रस्ताविकातून शाळेची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच देणगीदारांनी केलेल्या सहकार्याचे महत्त्व विशद केले.समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे मतही मुकुंद आष्टीकर त्यांनी व्यक्त केले.या देणगीतून शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, कपाट, टेबल, व्हाईट बोर्ड, चटया तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोठा लाभ होणार आहे.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.अध्यक्षीय समारोपात  डी. व्ही. मुळे यांनी श्री. मुकुंद आष्टीकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा दानशूर व्यक्तींमुळे शैक्षणिक संस्थांना निश्चितच बळ मिळेल . समाजातील इतरांनीही शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देण्याची प्रेरणा या कार्यातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मंगेश शेळके यांनी केले, तर भगवान पावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती विजयमाला काळे, कृष्णकांत खापरखुंटीकर, विष्णू कटारे, सुनील राठोड आणि  बाळू धनवे, तुकाराम अंभुरे यांनी परिश्रम घेतले.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …