केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा कट रचला. संधी साधून त्यांनी केतनला लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देत त्याचा जीव घेतला. या प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होत आहेत. केतनचा जेव्हा लोहगडावर मृत्यू झाला तेव्हा सिया तिथेच होती. तिने या घटनेनंतर हा अपघात असल्याचा बनाव करत ओरडण्यास सुरुवात केली. या घटनेच्या तात्काळ नंतर नेमकं काय घडलं, याबद्दल किल्ल्यावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव यांनी माहिती दिली आहे.
धीरज जाधव यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की, “मी माझ्या ड्युटी पॉईंटवर असताना मला दुरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. यानंतर मी धावतच आवाजाच्या दिशेने गेलो. तिथे पोहोचल्यावर मी पर्यटकांना काय झाले असे विचारले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सिया गोयल हिने सांगितले की, येथून कोणीतरी खाली पडलं आहे. तिने मला सुरुवातीला फार माहिती दिली नाही. मी वेळ न घालवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.” धीरज जाधव यांनी सांगितलं की, ही घटना घडताच सर्वात आधी सिया गोयल सतत हेल्प, हेल्प म्हणून ओरडत होती. यावेळी तिने ती प्रचंड घाबरली असल्याचं दाखवलं. किल्ल्यावर 24 तास सुरक्षा असते आणि जवळच पोलीस स्टेशन आहे. परंतु या भागात नेटवर्कच्या समस्येमुळे कधीकधी संपर्कास उशीर होतो, असंही त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.
केतन आणि सिया यांचा विवाह नोव्हेंबर 2026 मध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये होणार होता. याचं बुकिंगही पूर्ण झाले होतं. तसंच या लग्नासाठी दोन फ्लाईटही बुक करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारीमध्येच त्यांचा साखरपुडा झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, सिया केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आग्रह करत होती. 31 मे रोजी त्यांनी किल्ल्याला भेट दिली होती. त्यानंतर 4 जून रोजीही तिने आग्रह केला, मात्र केतनच्या आईने परवानगी दिली नाही. 14 जून रोजी लोहगडच्याच एका कड्यावरून सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, केतनने कड्यावरील एका झुडुपाचा आधार घेतल्याने तो थोडक्यात वाचला होता. यावेळी सियाने लगेचच केतनला मिठी मारली आणि साप आल्याचा बनाव केला. साप आल्याने आपण धक्का दिल्याचं सियाने यावेळी केतनला भासवलं. अखेर 18 जून रोजी ती आपल्या या भयंकर कटात यशस्वी झाली आणि प्रियकर चेतनसोबत मिळून तिने केतनचा जीव घेतला.
Shabdraj www.shabdraj.com