16/10/26
Breaking News

हिंगोली-मुंबई रेल्वे सेवा अखेर सुरू!  खासदार रामराव वडकुते यांचे हिंगोलीकरांना स्वागताचे आवाहन

हिंगोली,दि 05 ः
हिंगोली आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नांदेडहून हिंगोली मार्गे मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ नेते खासदार रामराव वडकुते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. उद्या (सोमवारी) या गाडीची पहिली अधिकृत धाव होणार असून, यामुळे हिंगोलीकरांचा मुंबई प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे.
बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण
वडकुते यांनी सांगितले की, “हिंगोलीवरून थेट मुंबईसाठी रेल्वे असावी, अशी नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी होती. यापूर्वी कुर्ल्याला जाणारी गाडी होती, पण काही कारणास्तव ती बंद झाली. त्यानंतर सुरू असलेली गाडी पहाटे ४ वाजता असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, तसेच त्यात स्लीपरऐवजी केवळ सिटींगची व्यवस्था होती.” प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता किमान एक तरी चांगली गाडी मिळावी यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू होते आणि या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
‘असा’ असेल रेल्वेचा मार्ग आणि वेळ
नांदेडहून सुटणारी ही नवीन गाडी (गाडी क्रमांक: 07667) उद्या सकाळी पावणे अकरा वाजता (१०:४५ AM) नांदेडवरून निघेल.
मार्ग: ही गाडी नांदेडवरून निघून पूर्णा, वसमत, हिंगोली, बडनेरा, भुसावळ आणि मनमाड मार्गे मुंबईला पोहोचेल.
ही गाडी दुपारी १ वाजता हिंगोली रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
वेळेत सुधारणेसाठी पुढे प्रयत्न करणार
वडकुते यांनी स्पष्ट केले की, सध्या या गाडीची वेळ प्रवाशांसाठी पूर्णपणे अनुकूल नसली तरी ही केवळ सुरुवात आहे. सध्या ही गाडी मुंबईला पहाटे ४ वाजता पोहोचेल. दिवसाचा प्रवास वेळ जास्त असल्यामुळे, आगामी काळात ही सेवा रात्रीची कशी करता येईल, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. “आधी ओसरीत जागा मिळवू, मग घरात मिळवू” या म्हणीचा दाखला देत त्यांनी सध्या मिळालेल्या गाडीचे स्वागत करण्याचे आवाहन केले.
हिंगोलीत होणार जंगी स्वागत; खासदार रामरावजी वडकुते उपस्थित राहणार
या गाडीच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार रामराव वडकुते यांना नांदेड येथे आमंत्रित केले होते. मात्र, त्यांनी नांदेडला न जाता हिंगोलीकरांसोबत हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि सर्व स्तरांतील लोकांनी उद्या दुपारी १ वाजता हिंगोली रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पहिल्या रेल्वे गाडीचे ऐतिहासिक स्वागत करावे, असे आवाहन खासदार रामरावजी वडकुते यांनी केले आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …