17/10/26
Breaking News

गंगाखेडचा इतिहास ढासळला… आता तरी प्रशासन जागे होणार का?

अतिक्रमण, दुर्लक्ष आणि राजकीय मौनामुळे शतकांचा वारसा संकटात

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहराचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी ठरला आहे. मोठ्या मारोती मंदिरासमोरील शतकांपूर्वीचा ऐतिहासिक बुरुज कोसळला आणि त्यासोबतच इतिहास संवर्धनाच्या दाव्यांचाही मुखवटा गळून पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र शतकांचा इतिहास अक्षरशः मातीत मिळाला.

 

 

निजामशाही काळातील किल्लेनगरी म्हणून ओळख असलेल्या गंगाखेडमध्ये एकेकाळी भक्कम तटबंदी, वेशी आणि बुरुज शहराच्या वैभवाचे प्रतीक होते. आज त्याच वारशावर अतिक्रमण, झाडाझुडपे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यांचे सावट आहे.

 

 

स्थानिक नागरिकांच्या मते, बुरुज परिसरातील अतिक्रमण वर्षानुवर्षे वाढत गेले. संबंधित यंत्रणांकडे अधिकार असूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिक्रमण वेळेत हटविले असते, नियमित देखभाल झाली असती आणि पुरातत्त्व विभागाने संवर्धनाची जबाबदारी पार पाडली असती, तर ही पडझड टाळता आली असती, असे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

आज प्रश्न केवळ एका बुरुजाचा नाही; गंगाखेडच्या सांस्कृतिक अस्मितेचा आहे. इतिहासाच्या प्रत्येक दगडावर राजकीय उदासीनतेची धूळ साचत असताना प्रशासनाने केवळ पंचनामे न करता ठोस कृती करणे आवश्यक आहे.

 

 

उर्वरित तटबंदी, वेशी आणि बुरुजांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांचे संवर्धन, अतिक्रमण हटविणे आणि पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्ती करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा पुढील पिढ्यांना गंगाखेडचा इतिहास पुस्तकांत वाचावा लागेल; प्रत्यक्षात त्याचे केवळ अवशेषच दिसतील.

Check Also

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दिनांक 17  : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने …