Sonam Wangchuk
नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी संबंधित पोलिसांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.
दिपके म्हणाले, “आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीमार अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह होता. लाठीमारासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. आज आमच्या आंदोलनाचा ३४ वा दिवस असून, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”
मात्र, त्यांनी सोनम वांगचूक यांना उपोषण मागे घेण्याचे भावनिक आवाहनही केले. “सोनम वांगचूक सरांनी उपोषण मागे घ्यावे, अशी आमची विनंती आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण व्हावा, हे आम्हाला मान्य नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी अभिजित दिपके यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही शांतता आणि संयम राखण्याचा सल्ला दिला. “भाजपकडून काही लोकांना आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी किंवा चिथावणी देण्यासाठी पाठवले जाऊ शकते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. शांततेने आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवा. शांतता आणि अहिंसा हीच आपल्या चळवळीची सर्वात मोठी ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “हे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू असून, त्याचा पाया सत्य, शांतता आणि अहिंसा यांवर उभा आहे. याच मार्गाने पुढेही वाटचाल करायची आहे. अनेक वर्षांनंतर देशात सत्याग्रहाची परंपरा पुन्हा पाहायला मिळत आहे. हे पाहून महात्मा गांधींनाही अभिमान वाटला असता.”
Shabdraj www.shabdraj.com