24/07/26
Breaking News

जंतर-मंतर आंदोलनाचा देशभरात वणवा! कॉकरोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक

Jantar Mantar protest spreads nationwide

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने शुक्रवार, २४ जुलै रोजी ‘एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्याखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात येत असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर यासंदर्भातील एक अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात देशभरात पोलिसांच्या कारवाई व दडपशाहीला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी आपल्या-आपल्या जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेऊन आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने आयोजित करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांसमोर विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांचे जाहीर वाचन करावे, असेही पत्रात म्हटले आहे.

आंदोलनासाठी सूचना

आंदोलनासाठी आवश्यक असलेली आचारसंहिता, आवश्यक साहित्याची यादी तसेच प्रशासनाला सादर करावयाच्या निवेदनाचा नमुना संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी “इंकलाब जिंदाबाद” आणि “भारत माता की जय” या घोषणांसह नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

राज्यासाठी हवामानाचा नवा अंदाज; हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Maharashtra Weather Update News मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावत मान्सूनने जूनमधील पावसाची …