17/10/26
Breaking News

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दिनांक 17  : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत संभाव्य पाणी, चारा टंचाईच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करा. प्रत्येक गावागावात पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनास केल्या.

पालकमंत्री झिरवाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणी, चारा आदींचा आढावा घेतला. श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,पूर्णा पाटबंधारे विभागा वसमतचे कार्यकारी अभियंता आर.पी. गरुड, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रांजली मुंडे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे राजू नरवाडे आदींची उपस्थिती होती. यांसह उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार, जिल्ह्यातील इतर सर्व मुख्याधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याीच सुनिश्च‍ितता करून योग्य ती अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठ्याचे सन 2026-27 या वर्षातील धरणनिहाय, वापरनिहाय पाणी वापर नियोजन निकषानुसार अंतिम करावे.

प्रत्येक प्रमुख जलाशयाच्या उपलब्ध जिवंत साठ्यापैकी 10 टक्के अतिरिक्त बफर, आपत्कालीन साठा राखून ठेवणे, नागरी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पाणी वापरात 10 टक्के कपात करणे, गळती प्रतिबंधक मोहीम राबविणे, सांडपाणी पुनर्वापर, औद्योगिक वापरासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर, पिण्याचे पाणी, औद्योगिक आरक्षणानंतर शिल्लक पाण्यानुसार रब्बी हंगामी पिके, चारा पिकांसाठी सिंचन पाळी, आर्वतनाचे वेळापत्रक निश्च‍ित करणे आदी बाबींचाही आढावा पालकमंत्री झिरवाळ यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांना सादरीकरणाद्वारे दिली.

जिल्ह्यातील पाणी पातळीतील घट, प्रकल्पातील पाणी साठा, पाणी वापराचे नियोजन, अवैध पाणी उपशांवर केलेली कारवाई, दुष्काळाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी, चारा उपलब्धता आणि वैरण विकासाबाबतच्या उपाययोजना, जलसंवर्धन, जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे, जिल्ह्यात निर्माण करण्यात येणारी 30 हजार जलतारा प्रकल्पसाठे यांसह पाणी वापर आणि काटकसरीबाबत केलेल्या उपाययोजनांचीही माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनीही जिल्ह्यातील एकूण पाणी परिस्थतीचा सविस्तर आढावा सादर केला.

Check Also

आरक्षण उपवर्गीकरण मोर्चाच्या तयारीसाठी सेनगावात मातंग समाजाची बैठक

सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे  मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित …