गंगाखेड तालुका प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा
गंगाखेड : पावसाने दिलेल्या खंडामुळे यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भूजलपातळीत घट होत असल्याने शहरातील काही भागांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शरद ऋतूतच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आगामी काळातील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईग्रस्त भागांत नवीन बोअरवेल घेण्यात यावेत, तसेच टँकरद्वारे नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कविता संदीप राठोड यांनी बुधवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील अनेक भागांत बोअरवेल व अन्य जलस्रोतांमधून पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाणीटंचाईग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घ्यावेत, बंद अथवा कमी क्षमतेने पाणी देणाऱ्या बोअरवेलची दुरुस्ती करावी, तसेच आवश्यक पंप व मोटारींची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत संबंधित भागांत टँकरद्वारे नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही नगरसेविका राठोड यांनी निवेदनातून सुचविले आहे.
जलसाठ्याचे नियोजन आणि बाष्पीभवनाचे आव्हान!
दरम्यान, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने गोदावरी नदीपात्र आणि मासोळी मध्यम प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या शिल्लक असलेल्या जलसाठ्यातून होणारे बाष्पीभवन, सण-उत्सवांच्या काळात वाढणारी पाण्याची मागणी आणि दैनंदिन वापर यांचा विचार करता पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.
नगराध्यक्षा उर्मिलाताई केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा प्रतिनिधी तथा गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे हे पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता जलस्रोतांची उपलब्धता, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील मागणी यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे.
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीटंचाईची चाहूल लागली असताना नगर परिषद प्रशासनाने संभाव्य संकटाचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.
Shabdraj www.shabdraj.com