17/07/26
Breaking News

खेर्डा शिवारातून बैलजोडी लंपास

रमेश बिजुले
पाथरी,दि 15 ः
पाथरी तालुक्यातील खेर्डा शिवारात शेतातील आखाड्यावर बांधून ठेवलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना गुरुवार १४ मे रोजी पहाटे घडली आहे.

खेर्डा येथील शेतकरी दत्ता किशनराव मस्के यांनी पाथरी पोलीसांना दिलेल्या अर्जानुसार, त्यांच्या मालकीची सुमारे सहा वर्ष वयाची लाल व जाबळ्या रंगाची बैलजोडी शेतातील कामासाठी वापरली जात होती. सदरील शेतकरी बुधवार १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बैलजोडी शेतातील आखाड्यावर बांधून वैरण चारा करून घरी परतले होते. त्यानंतर रात्री उसाला पाणी देण्यासाठी

पुन्हा शेतात गेले होते. दरम्यान गुरुवार १४ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता त्यांनी बैलांना वैरण टाकून पुन्हा उसाला पाणी देण्याचे काम सुरू केले. मात्र पहाटे साडेपाच वाजता आखाड्यावर परत आल्यानंतर दोन्ही बैल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी बैलांच्या गळ्यातील घंट्या जागेवर पडलेल्या होत्या तसेच बांधलेले दोर कापलेले दिसून आले. शेताच्या रस्त्यापासून आखाड्यापर्यंत चारचाकी पिकअप वाहनाच्या टायरचे ठसेही आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी वाहनातून चोरी करून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी शेतकर्याने केली आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …