गंगाखेड | प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षच्या वतीने कॉमरेड योगेश फड यांनी केंद्र सरकारकडे निवेदन सादर करत NEET व इतर राष्ट्रीय परीक्षा घेणारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) तात्काळ रद्द करावी, तसेच पारदर्शक व विश्वासार्ह पर्यायी यंत्रणा निर्माण करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
हे निवेदन मा. केंद्रीय शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना, तहसीलदार, तहसील कार्यालय गंगाखेड, जि. परभणी यांच्या मार्फत देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही वर्षांत NEET-UGसह महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी, निकालातील घोळ, गुणांमध्ये फेरफार असे गंभीर प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
NTA रद्द करण्याची ठळक कारणे :
* २०२४ च्या NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी व ग्रेस मार्क्स वादामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
* परीक्षा केंद्र वाटप, उत्तरपत्रिका तपासणी व निकाल प्रक्रियेत अपारदर्शकता
* घोटाळे उघड होऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठोस कारवाईचा अभाव
* परीक्षा रद्द, न्यायालयीन खटले व अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख मागण्या :
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) तात्काळ बरखास्त करावी.
परीक्षा प्रक्रियेत डिजिटल सुरक्षा, थर्ड पार्टी ऑडिट व विद्यार्थी प्रतिनिधींचा सहभाग बंधनकारक करावा.
NTA च्या कार्यकाळातील सर्व घोटाळ्यांची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी.
निवेदनात शेवटी स्पष्ट करण्यात आले की, विद्यार्थ्यांचे भविष्य म्हणजे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे अकार्यक्षम व अपारदर्शक यंत्रणा कायम ठेवणे परवडणारे नसून, विद्यार्थीहिताची नवी, विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था तातडीने उभी करावी, अशी ठाम मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
Shabdraj www.shabdraj.com