17/07/26
Breaking News

लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या पायाभूत विकासकामांवर भर

हिंगोली :
मौजे दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध पायाभूत विकासकामांवर भर देण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले.

या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, अणुऊर्जा वित्त विभागाचे सहसचिव मुथु कृष्णन शंकर नारायणन, लिगो इंडिया प्रकल्प प्रमुख सेंधील राजा एस तसेच लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन माने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पपूर्तीसाठी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण करण्यात येतील. तसेच येथील प्रकल्पासाठी आवश्यक असणारे भूसंपादनही पूर्ण झाले असून, भविष्यात प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे स्वत: प्रकल्पाला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून 5 किलोमीटर, 15 किलोमीटर, 30 किलोमीटर आणि 60 किलोमीटर अंतराच्या परिघात लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्टोन क्रेशर उद्योग, खाणकाम व ब्लास्टिंग आधारित उद्योग, 20 अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग उद्योग, नवीन वीज प्रकल्प, पवनचक्की उभारणीवरील निर्बंध लादण्याबाबत चर्चा करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाच्या दृष्टीने हे निर्बंध लिगो प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत शिथिल करण्यात यावेत, तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत केली.

जिल्ह्यातील विकासकामांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये अणुऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डामध्ये या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि सकारात्मक निर्णयासह आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाला बैठकीत दिले.

या बैठकीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच लिगो इंडिया प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील काळात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …