18/07/26
Breaking News

हिंगोली पालिकेने दिलेला शब्द पाळला; नमो उद्यानाचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

हिंगोली,दि 15 ः
नगरपालिकेच्या निवडणूक काळात दत्त गल्ली आणि मंगळवारा बाजार परिसरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हिंगोली नगर परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे. येथील पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्याना’चे भूमिपूजन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नगर उद्यान योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारले जाणार आहे.
मंगळवारा बाजार आणि दत्त गल्ली परिसरातील नागरिकांनी निवडणूक काळात दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. यात मंगळवारा बाजार पुन्हा मूळ जागेत भरवणे आणि पाण्याच्या टाकीखालील जागेत उद्यान विकसित करणे, यांचा समावेश होता. नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी हे आश्वासन पूर्ण केले असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र फिरण्याची आणि बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, तसेच आरोग्यासाठी ‘ओपन जिम’ यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेना गटनेते नगरसेवक श्रीराम बांगर, सुभाष बांगर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, खली बांगर, संदीप बांगर, विशाल गोटारे, रामकिसन बांगर, गुड्डू बांगर, नितीन बांगर, धनंजय मेथेकर, मोहनराव शार्दूल, सुधाकरराव रत्नपारखी, नागोराव देशपांडे, श्यामराव इटोलिकर, राजूभाऊ मुंदडा, रवी मुंदडा, कृष्णराव जोशी, स्वप्नील सोनपावले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या नमो उद्यानाचा स्थानिक नागरिकांनी आणि मुलांनी आरोग्यासाठी लाभ घ्यावा,” असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी केले.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …