पाथरी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दिव्यांग संघर्ष समिती, महाराष्ट्र (शाखा परभणी) यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी, पाथरी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
समितीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अल्ताफ मोहम्मद आसिफ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचत नसून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यापूर्वी दि. १९ जानेवारी २०२४, ४ मार्च २०२५, १४ ऑक्टोबर २०२५, तसेच ३ जानेवारी २०२६ रोजीही निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
समितीने आपल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
▪️ दिव्यांगांसाठी नगरपालिकेच्या निधीपैकी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवावा
▪️ दिव्यांगांची घरपट्टी व नळपट्टी पूर्णपणे माफ करावी
▪️ नगर परिषद हद्दीत दिव्यांगांना २०० चौ. मीटरचे गाळे उपलब्ध करून द्यावेत
▪️ दिव्यांगांना कोणत्याही अटींशिवाय घरकुल योजना उपलब्ध करून द्यावी
या मागण्यांसाठी यापूर्वी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. दि. ३ जानेवारी २०२६ रोजी उपोषणासाठी अर्ज सादर करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पाथरी येथील पोस्ट ऑफिस चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘भिक मागो आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद पाथरी, तहसीलदार, पाथरी तसेच पोलीस निरीक्षक, पाथरी यांना देण्यात आल्या आहेत.निवेदन देताना मोहम्मद अल्ताफ ,नितिनकुमार वैराळे ,मनोज कुमार माने ,सुनिल (काका)तळेकर ,प्रशांत पामे ,मनोज केदारे ,शेख नदिम ,शेख निसार ,रामप्रभु टोके ,आसिफ युनूस बागवान ,सुरैय्या शेख ईब्राईम ,महमुद गफार ,मोहम्मद ईल्यास व ईतर दिव्यांग बांधव ऊपस्थीत होते .
Shabdraj www.shabdraj.com