25/06/26
Breaking News

हिंगोलीत माणुसकीचा ‘अक्षय’ झरा: १५ वर्षांपासून अविरत सुरू आहे ‘अन्नछत्र सेवा’!

हिंगोली,दि 29 (प्रतिनिधी) ः
“तहानलेल्यांना पाणी आणि गरजवंतांना कपडे” या संत शिरोमणी साईबाबांच्या पवित्र शिकवणीचा वारसा जपत, हिंगोली शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ‘अक्षय साईपात्र अन्नछत्र सेवा’ मागील १५ वर्षांपासून एकही दिवस खंड पडू न देता अविरतपणे सुरू आहे. जात, पात, धर्म यापलीकडे जाऊन ‘सर्वधर्मसमभाव’ जपणाऱ्या या अन्नछत्राने हजारो गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार दिला आहे. या सेवायज्ञात अधिक मासाचे औचित्य साधून शहरातील नामांकित उद्योजक श्री. जगजितराज खुराणा आणि अजिंक्य नागरे यांनी सलग ३३ दिवस दररोज एका विशेष खाद्यपदार्थाचे वाटप करून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची क्षुधा भागवली. त्यांच्या या अनोख्या सत्कर्माने हिंगोलीच्या दातृत्व परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

दानशूर दात्यांच्या बळावर ‘अक्षय’ सेवा
साई माऊली मंदिर (रिसाला बाजार) यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय परिसरात हे अन्नछत्र चालवले जाते. शासकीय रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून अत्यंत गरीब आणि गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा रुग्णांच्या सोबतीला आलेल्या नातेवाईकांना पैशांभावी उपाशी राहण्याची वेळ येते. अशा वेळी ‘अक्षय साईपात्र’ त्यांच्यासाठी अन्नदात्याच्या भूमिकेत उभे राहते. हे केवळ शहरातील आणि जिल्ह्यातील संवेदनशील, दानशूर व्यक्तींच्या आर्थिक आणि मानसिक सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. “दिल्याने कधीही कमी होत नाही, उलट त्याचा परतावा म्हणून ईश्वरी शक्ती आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी देते,” हा विश्वास या संस्थेने आपल्या पारदर्शक कार्यातून निर्माण केला आहे. दानाचा कोणताही दुरुपयोग न करता, प्रत्यक्ष भुकेलेल्याच्या मुखात घास जावा यासाठी संस्था अहोरात्र झटत असून, संपूर्ण हिंगोलीकर याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.
अधिक मासात ३३ दिवस अनोखा उपक्रम
हिंदू धर्मात अधिक मासाला (धोंड्याचा महिना) विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या पवित्र महिन्याचे निमित्त साधून शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री. जगजितराज खुराणा आणि अजिंक्य नागरे यांनी सामाजिक बांधिलकीचे एक वेगळेच उदाहरण प्रशासनासमोर आणि समाजासमोर ठेवले. त्यांनी अधिक मासाच्या संपूर्ण ३३ दिवसांत अन्नछत्राला भेट देऊन, दररोज एका वेगवेगळ्या चवदार खाद्यपदार्थाचे नियोजन केले. स्वतः उपस्थित राहून त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या पदार्थांचे आपुलकीने वाटप केले. त्यांच्या या उपक्रमामुळे रुग्णालयातील वातावरणात एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
अमुल्य क्षण सत्कर्माने साजरे करण्याचे आवाहन
आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण जसे की- जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, किंवा प्रियजनांची जयंती व पुण्यतिथी, हे हॉटेलमध्ये किंवा इतरत्र वायफळ खर्च करून साजरे करण्याऐवजी, अशा पवित्र अन्नछत्रात येऊन स्वहस्ते अन्नदान करून साजरे करावेत, असे आवाहन अन्नछत्र सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे मनाला मिळणारे समाधान अतुलनीय असते.
उद्योजक जगजितराज खुराणा आणि अजिंक्य नागरे यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे संपूर्ण हिंगोली शहरात कौतुक होत असून, भविष्यातही दानशूरांनी आपल्या आशीर्वादाचे आणि सहकार्याचे छत्र या अन्नछत्रावर असेच अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …