06/06/26
Breaking News

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम

नांदेड, दि. 3 जून: नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीच 13 लाख 84 हजार 721 रुपयांचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 1, हिंगोली जिल्ह्यातील 1 आणि लातूर जिल्ह्यातील 2 अशा एकूण 4 कारवायांचा समावेश आहे.
गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील ही विशेष मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असून, अशा पदार्थांची विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, गुटखा व अमली पदार्थांच्या विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या पानटपऱ्यांचीही व्यापक तपासणी सुरू करण्यात आली आहे. एका दिवसात नांदेड परिक्षेत्रातील 264 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून संशयित ठिकाणांची कसून चौकशी सुरू आहे.
अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी थेट पोलिसांना द्यावी, यासाठी 9150 100 100 हा टोल-फ्री ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Check Also

शेवाळा येथे 30 वय वंदना कार्ड वाटप

हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य …