24/06/26
Breaking News

गंगाखेड रेल्वे स्टेशन परिसरात भीषण आग; घर, संसारोपयोगी साहित्य आणि भंगार गोदाम जळून खाक

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत राजाभाऊ गुंड यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम तसेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली मोटारसायकलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील उकिरड्यावर कचरा जाळण्यात आल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठमोठे लोट दिसू लागताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रसंगी सिताराम भेंडेकर यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून संभाव्य जीवितहानी टळली.

 

दरम्यान, शेजारी असलेल्या सोहेल कुरेशी यांच्या भंगार दुकानातील प्लास्टिक साहित्याने पेट घेतल्याने आग आणखी भडकली. या आगीत अंदाजे तीन लाख रुपयांचे भंगार साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद गंगाखेड, जि-7 साखर कारखाना तसेच पालम नगर पंचायत येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

या घटनेत घर आणि भंगार गोदामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गंगाखेड नगर परिषदेचे उपाध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून पथकाला घटनास्थळी पाचारण केले.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …