16/10/26
Breaking News

अतिरिक्त शिक्षकांच्या न्यायासाठी ‘मुप्टा’शिक्षक संघटना धडकणार; शिक्षणाधिकारी कार्यालयाला जाब विचारणार- महादेव लोखंडे

परभणी | प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मुप्टा शिक्षक संघटना आता आक्रमक झाली असून, अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी लवकरच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव लोखंडे यांनी दिली.
अतिरिक्त शिक्षकांचे महिनोनमहिने रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, समायोजनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अतिरिक्त शिक्षकांचे आक्षेप अर्ज तातडीने निकाली काढावेत, तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे.
जिल्ह्यात अनेक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अद्यापही प्रलंबित आहे. काही शिक्षक समायोजित शाळेत नियमितपणे हजेरी लावत असतानाही संबंधित शाळांकडून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली जात नसल्याने त्यांचे वेतन रखडले आहे. परिणामी अनेक शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले असून, दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नांबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव लोखंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करून समायोजन प्रक्रिया पूर्ण करावी, आक्षेप अर्ज निकाली काढावेत तसेच अतिरिक्त शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रशासकीय प्रश्न तातडीने सोडवावेत. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभाग व प्रशासनाची राहील.
मुख्य मागण्या
अतिरिक्त शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करावे.
प्रलंबित समायोजन प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
अतिरिक्त शिक्षकांचे आक्षेप अर्ज तातडीने निकाली काढावेत.
दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
अतिरिक्त शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रशासकीय प्रश्न तातडीने निकाली काढावेत.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …