16/10/26
Breaking News

एसआयआर मोहिमेत सहकार्य करा – तहसीलदार शृंगारे यांचे नागरिकांना थेट आवाहन*

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा :
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR–2026) मोहिमेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघात वेग आला असून तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी प्रत्यक्ष प्रभागभेटी देत नागरिकांना सहकार्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रशासनाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण १७८ मतदान केंद्रे असून त्यात ४४ शहरी व १३४ ग्रामीण मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी २ AERO, १८ BLO सुपरवायझर, १७८ BLO व १७८ BLO सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारसंघातील एकूण संभाव्य मतदारसंख्या ८१,२७७ इतकी असून त्यात ४६,७६३ पुरुष, ३४,५१४ महिला आणि १ अन्य मतदार आहे.
शहरी भागात २१,८०० महिला व २२,४५४ पुरुष, तर ग्रामीण भागात ५९,४७७ महिला व ६५,००९ पुरुष मतदार नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(दि. ४ जुलै, शनिवार) रोजी खडकपुरा गल्ली येथे तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी पाहणी करत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी अर्ज व फॉर्म भरून घेण्याचे कामही प्रत्यक्ष ठिकाणी करण्यात आले. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून एसआयआर मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी सागर जगतकर, बीएलओ शेख चांद यांच्यासह फारुख पठाण, गौसखान पठाण, निहाल पठाण व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …