24/06/26
Breaking News

हिंगोलीचा वीज प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवाजी मुटकुळे यांच्या महावितरणला सूचना

हिंगोली,दि 22 (प्रतिनिधी)
शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा आणि सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना येणारी अव्वाच्या सव्वा वीजबिले या गंभीर समस्यांवर भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांसह महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि हिंगोलीचा वीज प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला महावितरणचे हिंगोली येथील कार्यकारी अभियंता चव्हाण, सर्व उपविभागीय अधिकारी आणि विभागातील प्रमुख तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत शिवाजी मुटकुळे यांनी नागरिकांच्या समस्या मांडताना सांगितले की, हिंगोली शहरातील विविध नागरी वस्त्यांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे तासनतास वीज गुल होण्याचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना अंधारात राहावे लागू नये, यासाठी महावितरणने तातडीने पर्यायी वीजवाहिन्या कार्यान्वित कराव्यात आणि दुरुस्ती पथके २४ तास सज्ज ठेवावीत.तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशी आणि योग्य दाबासह वीज मिळाली पाहिजे. ग्रामीण भागात जळालेले डीपी आणि ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी महावितरणकडून होणारी दिरंगाई त्वरित थांबवून हे ट्रान्सफॉर्मर विनाविलंब बदलून देण्यात यावेत. तसेच टोल-फ्री क्रमांकावर येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता नागरिकांशी थेट संवाद ठेवावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
या बैठकीला नगरसेवक हमिद प्यारेवाले, अजय गायकवाड, उमेश गुठ्ठे, रामरतन शिंदे, ॲड. राजु गोटे, विलास गोरे, बाबा घुगे, रजनीश पुरोहित, पवन उपाध्ये यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …