24/06/26
Breaking News

स्वच्छता व पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी कळमनुरी येथील ब्राह्मण गल्लीतील महिला आक्रमक

कळमनुरी,दि 22
शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असून स्वच्छतेच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील महिलांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

ब्राह्मण गल्ली परिसरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही अवेळी होत असल्याने महिलांना दैनंदिन कामकाज करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमितपणे पाणीकर भरूनही महिन्यात केवळ दोन ते तीन वेळाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी ७ ते ९ या निश्चित वेळेत आणि किमान दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
तसेच परिसरातील नाल्या तुडुंब भरल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. कचरागाडी नियमित येत नसल्याने दुर्गंधी पसरली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा नाल्यांची साफसफाई करावी, दररोज कचरागाडीची सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन या समस्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर सौ. उषा कावडे, सौ. कविता कावडे, सौ. श्रद्धा देशपांडे, सौ. शारदा घोलप, सौ. लीला कस्तुरे, सौ. गौरी कस्तुरे, सौ. शिवानी, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. गीता कावडे, सौ. मालती दिवाळकर, सौ. वैशाली कावडे, सौ. मंजू पांडे, सौ. वैशाली लाखकर, सौ. रेणुका जोशी, सौ. नंदा देशमुख, सौ. राजश्री अग्रवाल, सौ. नलिनी दिवाळकर, सौ. दिपाली पाध्ये, सौ. अंजली कामठकर, सौ. माधवी, सौ. संगीता कावडे, सौ. सुरेखा कावडे, सौ. अंजली राऊत, सौ. सुमती कावडे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …