13/05/26
Breaking News

ठेका वाळू उपसायचा दिला की गोदावरीचं कंबरडं मोडायचं?

गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा
गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याचा ठेका दिला म्हणजे काय—नदीची खुलेआम कत्तल करण्याचा परवाना दिलाय का? असा संतप्त सवाल आज गंगाखेड शहरातला सामान्य माणूस रस्त्यावर उभा राहून विचारतोय. ४, ६, ९ ब्रास भरलेले हायवा हजारो लिटर पाणी रस्त्यावर सांडत, धुराळा उडवत, सुसाट वेगानं धावतात… आणि प्रशासन गप्प!
ठेका दिला म्हणजे नियम संपले का? किती लोड, किती फेऱ्या, कोण पाहणार, कोण थांबवणार—यावर कुठलाच अंकुश नाही. रस्त्यावर किती वजनाची वाहतूक चालते, नियम मोडले जातायत का, याकडे पाहणारा अधिकारी आहे का नाही? की ही यंत्रणा वाळू माफियांसमोर गुडघे टेकून बसली आहे?
ही व्यवस्था कुठं गेली? नदीची हत्या उघड्या डोळ्यांनी होत असताना रोखणार कोण? किती जण या खेळात आपापलं उखळ पांढरं करून घेतायत, याची चर्चा गल्लीबोळात, चहाच्या टपरीवर, शेतशिवारात होतेय. लोक पोटतिडकीनं सांगतात—कोणाचे टिप्पर, किती, पावत्या कशा बनतात, कशा जागेवरच ‘जिरतात’, पाण्याचा हिशोब कुठं मुरतो… आणि या सगळ्यात भ्रष्ट राजकारणी व कामचोर अधिकारी आपली घरं भरतायत!
लोक सध्या गप्प आहेत, पण हा संयम संपलाय. निसर्ग कोपेल, सामान्य माणूस पेटेल, आणि तेव्हा धरा कमी पडेल—हे लक्षात ठेवा. पोलिसांच्या खबऱ्यांपेक्षा वाळू माफियांचं खबरी जाळं मजबूत आहे. टीव्ही फुटेज नाही, पुरावे नाहीत—म्हणून सगळं मोकळं!
आज नदीला मारताय, उद्या माणूस सुरक्षित ठेवणार का? हा सवाल गंगाखेड–धारखेड पुलावरून भांबरवाडी धक्क्याकडे नजर टाकली की अंगावर येतो. आठ-दहा बोटी, रेसिपी, पोकलेनचा कर्कश आवाज, आणि ठेकेदाराने ठेवलेली गुंडांची झुंड—डोळ्यात भरणाऱ्या भयानक नजरा!
प्रशासन लोकांसाठी आहे की या लुटारूंसाठी? हा प्रश्न सुटणार कधी? की गोदावरी आक्रोश करतच वाहणार आणि सत्ताधारी, अधिकारी कानात बोळे घालून बसणार?
गंगाखेडचा जनतेचा रोष वाढतोय—वेळीच जागे व्हा, नाहीतर उद्रेक अटळ आहे!

Check Also

जल जीवन व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

परभणी, दि.७- जल जीवन मिशन (JJM) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM-G) अंतर्गत कार्यरत कंत्राटी …