17/07/26
Breaking News

पोलिसांच्या संवेदनशील प्रयत्नामुळे १२ वर्षानंतर मायलेकांची झाली भेट

नारायण पाटील
सेलू,दि 23 ः
खबर मिळताच माणुसकी व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सेलू पोलिसांनी केलेल्या संवेदनशील प्रयत्नामुळे तब्बल १२ वर्षानंतर येथील मायलेकांची भेट झाली आहे .पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .

मुंबई कार्यक्षेत्रात १३ जानेवारीला भिक्षेकरीविरुद्ध कारवाई दरम्यान पोलीस पथकाला एक महिला भिक्षा असताना आढळून आली. संबंधित पोलीस यंत्रणेने या महिलेला जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे आणून कारवाई करून न्यायालयाच्या आदेशाने चेंबूर येथील शेल्टर होममध्ये रवाना केले. या महिलेबाबत कोशिश संस्थेच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेतला असता महिलेचे नातेवाईक सेलू येथे राहत असल्याचे समोर आले. त्यावरून सेलूचे पोलीस कर्मचारी शिवदास सूर्यवंशी यांनी माहितीच्या आधारे १२ तासाच्या आत सदरील महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला. पोलीस हवालदाराने दाखविलेल्या कार्य तत्परतेमुळे महिलेला तिचे नातेवाईक मिळून आले.

सेलू ठाण्यातील पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी असे कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. गोदावरी राऊत ही महिला १३ जानेवारीला मुंबई कार्यक्षेत्रात परिमंडळ एकच्या पथकातील कर्मचारी भोसले यांना आढळून आली होती. यानंतर सदरील महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करून तिला सर जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. तेथून न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने चेंबूर येथील शेल्टर होममध्ये जमा करण्याचे आदेश दिले होते. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने व कोशिश संस्थेच्या वतीने नातेवाईकांच्या शोध घेतला असता त्यांचे नातेवाईक परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राहत असल्याची माहिती मिळाली. कोशिश संस्थेने पाठपुरावा केला असता सेलू पोलीस ठाण्याचे हवालदार शिवदास सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला व त्यांनाही माहिती दिली. शिवदास सूर्यवंशी यांनी तुटपुंजा माहितीच्या आधारे १२ तासाच्या आत सेलू हद्दीत सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यांचा मुलगा किशोर राऊत यांनी त्यांची आई सीएसटी मुंबई येथून बारा वर्षांपूर्वी हरविल्याचे सांगितले. ही महिला तीच हरवलेली महिला असल्याचे तपासातून समोर आल्यावर जे जे मार्ग पोलीस ठाणे यांनाही संपर्क करून ही माहिती दिली. शिवदास सूर्यवंशी यांनी कमी वेळात समयसूचकता दाखवत कार्य तत्परतेने बारा वर्षांपूर्वी हरविलेल्या महिलेची नातेवाईक शोधण्यासाठी मोलाची कामगिरी केली. याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना ही बाब पत्राद्वारे कळविली. त्यावरून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिवदास सूर्यवंशी यांचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडून आणि जिल्हा पोलीस दलात कौतुक होत आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …