परभणी,दि 06
शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या बळावर गेल्या २४ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा २४ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या सर्व शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाने एक प्रेरणादायी सोहळ्याचे स्वरूप धारण केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवसांभ सोनटक्के,तसेच प्रमुख पाहुण्या सौ. गंगाबाई सोनटक्के, प्रा. किरण सोनटक्के, सौ. शितल सोनटक्के,तसेच सर्व समन्वयक, विभाग प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेच्या लौकिकात भर घालणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. JEE Advanced परीक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवून देणारे तसेच इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षांमध्ये सर्वोत्तम निकालासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांना बक्षिसे प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
संस्थेच्या सेवेत प्रदीर्घ काळ समर्पित भावनेने कार्य करून सेवानिवृत्त होत असलेल्या सौ. अर्चना चाफेकानडे मॅडम यांचा भावपूर्ण सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
तसेच संस्थेतील नवनियुक्त विभागप्रमुखांचा सन्मान करून त्यांना नवीन जबाबदाऱ्यांचा पदभार सोपविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. आर. एस. चाफे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत, ज्ञानसाधना प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.
प्रमुख पाहुण्या संस्थासचिव सौ. शितल सोनटक्के मॅडम यांनी आपल्या मनोगतात आधुनिक शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा समतोल विकास घडविणे ही शिक्षकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “गेल्या २४ वर्षांत ज्ञानसाधना प्रतिष्ठानने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामागे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे एकत्रित योगदान आहे. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पण या मूल्यांच्या आधारे भविष्यातही संस्थेची यशोगाथा अधिक भव्य स्वरूप धारण करेल.”
अध्यक्षीय समारोपात श्री. शिवसांभ सोनटक्के यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “प्रा. किरण सोनटक्के यांच्या जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे आज ज्ञानसाधना प्रतिष्ठान आदर्श शिक्षणसंस्था म्हणून नावारूपाला आली आहे. संस्थेची ही भरारी निश्चितच अभिमानास्पद आहे.”
कार्यक्रमानंतर सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. व्ही. कदम यांनी केले, तर श्री. एन . पी. खपरले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Shabdraj www.shabdraj.com