कळमनुरी: तालुक्यातील पुयना शिवारात सांडस ते कळमनुरी रोडवरील पुलाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करून 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुदाम कैलास गाडे रा. पाळोदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48(7) व 48(8) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता आरोपी सुदाम गाडे हा निळ्या रंगाच्या सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टर हेडला विना क्रमांकाची ट्रॉली जोडून त्यामध्ये एक ब्रास रेती भरून कोणताही वैध परवाना नसताना अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित वाहनासह वाळू जप्त करण्यात आली.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर हेड (किंमत 4 लाख रुपये), विना क्रमांकाची ट्रॉली (किंमत 1 लाख 20 हजार रुपये) आणि एक ब्रास वाळू (किंमत 6 हजार रुपये) यांचा समावेश असून एकूण 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली खाली कळमनुरी पोलीस निरीक्षक जमीर नाईक व पोलीस पथकाने केली आहे
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करीत आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
Shabdraj www.shabdraj.com